सत्यमेव जयते|
सत्यम् ब्रूयात् प्रियम् ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम्
प्रियम् च नानृतम् ब्रूयात् एवम् वदति पंडितः
माणसाने खरं बोलावं, गोड (लोकांना जे आवडेल) ते बोलावं. पण सत्य जर कटू असेल तर ते टाळावे.
One should always speak truth. But if it is going to hurt somebody's feelings then such bitter truth should be avoided.
युधिष्ठिर हा सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध होता. पण तोही परिस्थितीला अनुसरून वरील वचनाला जागला. तर मग आपल्यासारख्या सामान्यांची काय बिशाद. प्रत्येकजण गरज पडेल तसे खोटं बोलतो. आणि मग ते अंगवळणीच पडते. कित्येकदा एक खोटं लपवण्यासाठी मग हजारवेळा खोटं बोललं जातं. मला अशा लोकांची कीव येते. मी काही सत्यवचनी हरिचंद्राचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा वसा घेतलेला नाही. पण जर काही गोष्टी जर सरळ असतील तर उगाचच वाकडेपणात शिरण्यात काय अर्थ आहे?
उदाहरणार्थ, मला जर कोणी एखादा पदार्थ चाखण्यासाठी दिला आणि त्यात मीठ कमी असेल किंवा तिखट जास्त झाले असेल तर मी ते सरळ सांगेन. ह्यात मी त्या व्यक्तीच्या परिश्रमांचा अपमान करत नाही. पण तो पदार्थ अजून चांगला कसा करता येईल ह्यासाठी मदत करते. म्हणून मलातरी ह्यात काही गैर वाटत नाही.
जर का तुम्ही फक्त त्या व्यक्तीचं मन/मर्जी राखण्यासाठी खोटं बोललात तर ती व्यक्ती स्वतःच्या त्रुटी नजरेआड करेल. पण जर ती व्यक्ती स्वतःच्या त्रुटी जाणत असेल तर तुम्ही फक्त वस्तुस्थितीवर पडदा घालत आहात हेच त्यातून सिद्ध होईल. त्यातून तुम्ही तुमच्याच विश्वासार्हतेला तडा देता.
स्पष्टवक्तेपणामुळे नातं मजबूत होतं ह्या मताची मी आहे. कित्येकदा प्रसंगी परखडपणाही वापरावा लागतो. जर त्यामुळे नात्यात कटुता आली तर ते नाते मुळातच मजबूत नव्हते असे मी म्हणेन. आढेवेढे घेतलेले खोटे गोडीगुलाबीचे बोल सरळ सांगितलेल्या कडवट सत्यापेक्षा कितीतरी पटीने कडू असते. माझ्या स्वानुभवावरून मी सांगते की असे सरळ वागणे आणि बोलणे तुमची मैत्री सुदृढ करते. माझे खास असे फार कमी मित्रमैत्रिणी आहेत आणि मला नसत्या लवाजम्यापेक्षा ते बरं वाटतं. माझे असे आचारविचार काही लोकांना खटकतात. पण शंभर दिखाऊ मित्रांपेक्षा जो तुम्हाला तुमच्या चुका दाखवेल असा एखादाच सच्चा मित्र लाखमोलाचा.